Wednesday, 21 December 2022

लघवीच्या तपासणीने काय समजते ?

 *आरोग्य धनसंपदा*


  लघवीच्या तपासणीने काय समजते ?

तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला तक्रारी विचारतात. तुमची तपासणी करतात. बऱ्याचदा तुम्हाला पॅथाॅलॉजी लॅबमध्ये जाऊन लघवीचे तपासणी करायला सांगतात. लघवीच्या तपासणीतून डॉक्टरांना काय समजते, ते आता समजावून घेऊ.

मूत्रपिंडामध्ये सतत रक्त गाळले जात असते. या प्रक्रियेत रक्तातील विषारी, टाकाऊ पदार्थ, अतिरिक्त पाणी आणि क्षार रक्तातून बाहेर काढले जातात. याचाच परिणाम म्हणून लघवी तयार होते. शरीरात चालणार्‍या चयापचयामुळे लघवीतील घटकही बदलत असतात. आता सामान्यपणे लघवीच्या ज्या तपासण्या केल्या जातात त्यामुळे काय समजते ते पाहू.

लघवीमध्ये सामान्यतः ग्लुकोज असायला नको. लघवीत जर ग्लूकोज असेल तर रुग्णाला मधुमेह असण्याची शक्यता असते. लघवीत अल्बुमिन हे प्रथीन जास्त प्रमाणात असले तर रुग्णाला मूत्रपिंडाचा विकार, गरोदरपणातील उच्च रक्तदाब इत्यादी रोग असण्याची शक्यता असते. 

लघवीत पित्ताचे क्षार किंवा बिलीरुबीन, युरोबिलीनोजेन आदी पदार्थ असतील तर कावीळ असण्याची शक्यता असते. लघवी मध्ये स्फटिक असतील तर अशा रुग्णांमध्ये क्षारांच्या चयापचयात दोष असू शकतो. लघवीत काही संप्रेरके आढळून आल्यास विशिष्ट रोगांचे निदान होऊ शकते. गरोदरपणाची खात्री अशाच प्रकारच्या एका तपासणीमुळे करता येते. 

लघवीत पू येत असेल तर मूत्रमार्गात काही जंतुसंसर्ग असू शकतो. लघवीत रक्त वा रक्तातील लाल रक्तपेशी येत असतील; तर मुतखडा, मुत्रपिंडाचा क्षयरोग किंवा मूत्रमार्गातील जखम यांसारखे रोग असू शकतात. लघवीमध्ये काही जंतू असले किंवा पू मधील पेशी असल्या, तर मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाचे निदान होऊ शकते.

याखेरीज लघवीचे प्रमाण, लघवी करताना वेदना होणे, लघवी करताना जळजळ होणे, लघवी वारंवार होणे, लघवी न होणे; या सर्वांमुळेही काही रोगांचे निदान होऊ शकते. यावरुन तुमच्या लक्षात येईलच की, लघवी तपासल्याने अनेक गोष्टी कळु शकतात. त्यामुळे कंटाळा न करता लघवीची तपासणी करायला हवी.


डॉ. जगन्नाथ दीक्षित

डाॅ. अंजली दीक्षित

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

मनोविकास प्रकाशन




No comments:

Post a Comment