Wednesday 8 July 2020

‘दूरदर्शन’ महामालिका - “टिलीमिली”

सप्रेम नमस्कार                                                                                                                                                                                     विषय: पहिली ते आठवी इयत्तांच्या अभ्यासक्रमावर ‘दूरदर्शन’ महामालिका - “टिलीमिली” २० जुलै २०२० पासून ‘सह्याद्री’ वाहिनीवर – दीड कोटी विद्यार्थ्यांना लाभ.
कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे १४ मार्च २०२० पासून महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या. त्या अद्यापही उघडता आलेल्या नाहीत. तसेच घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभी राहिलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा नियमितपणे कधी व कशा सुरू होऊ शकतील यासंबंधी अनिश्चितता असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अशा अपवादात्मक परिस्थितीत ‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन’ या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरविले आहे. या उपक्रमात प्रयोगशील शिक्षणात भरीव कार्य केलेल्या ‘ग्राममंगल’ व इतर नामांकित संस्थांचा व तज्ज्ञांचा सक्रीय सहभाग आहे. 
या मालिकेचे नाव शालेय विद्यार्थ्यांना आवडावे यादृष्टीने “टिलीमिली” असे ठेवण्यात आले आहे. राज्यात सर्वदूर राहणाऱ्या सुमारे दीड कोटी ‘टिलींना व मिलींना’ अर्थात मुलामुलींना त्यांच्या घरच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणी संचावर या नि:शुल्क सेवेचा रोज लाभ घेता येईल. ही मालिका त्यांच्या पालकांनीही मुलांसोबत जरूर बघावी व त्यात सुचवलेले उपक्रम त्याच दिवशी मुलांबरोबर घरी व परिसरात करून शिकावे.
“टिलीमिली” मालिका ‘बालभारती’च्या पहिली ते आठवी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित असेल. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नसतील. मुलांना घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतीनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव घेऊ दिले जतील, त्यांच्याभोवती छोट्या-छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जाईल, त्यांना ताण येऊ नये यासाठी स्वच्छ, मोकळे, आनंदी वातावरण व भावनिक सुरक्षितता असेल व चुका करत स्वत:ची अर्थबांधणी स्वत:च करण्याचे स्वातंत्र्य दिलेले असेल. असे केल्याने मुले हसत-खेळत स्वत:च कशी शिकतात हे मालिकेच्या प्रत्येक भागात बघायला मिळेल. अशी सहज, आनंददायक व ज्ञानरचनावादी प्रकिया उलगडत राहिल्याने मुलांना ही मालिका रोज स्वत: शिकण्याची स्फूर्ती देईल, त्यांचा आत्मविश्वास वाढवेल व शिकायचे कसे हे शिकवेल.
जेव्हा औपचारिक व्यवस्था बंद ठेवावी लागते तेव्हा परिसरातले उत्साही व अभ्यासू मावशी व काका स्वयंस्फूर्तीने कसा पुढाकार घेतात व आपल्या कॉलनीतल्या, वाडीतल्या, वस्तीतल्या किंवा शेजारच्या एकेक दोन-दोन मुलांच्या गटांना  ज्ञानरचना करायला रोज आपल्या घरी कशी मदत करू शकतात हेही “टिलीमिली” मालिका जाताजाता दाखवत राहील. त्यामुळे अनेक ठिकाणी ‘वाडीवस्ती-शिक्षण’, ‘कॉलनी-शिक्षण’ किंवा ‘मोहल्ला-तालिम’ देणारे ‘ज्ञानरचना सुलभक’ राज्यात पुढे यावेत अशी अपेक्षा आहे.  
रोज प्रत्येक इयत्तेचा एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे ६० पाठ ६० दिवसात ६० एपिसोड्समध्ये सादर केले जातील. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार असे ६ दिवस हे एपिसोड्स सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील. त्यामुळे “टिलीमिली” मालिका सलग दहा आठवडे प्रसारित केली जाईल. 
आठही इयत्तांचे मिळून ४८० एपिसोड्स असलेली ही महामालिका सोमवार, दिनांक २० जुलै २०२० रोजी सुरू होईल व शनिवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी समाप्त होईल. 
सामान्यत: कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने मराठी माध्यमाव्यतिरिक्त पण मराठी समजणाऱ्या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त वाटेल. 
दिनांक २० जुलै ते २६ सप्टेंबर २०२० या काळातील इयत्तावार (रविवार वगळून) दैनंदिन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:           
वेळ                            इयत्ता
सकाळी ७.३० ते ८.०० - आठवी
सकाळी ८.०० ते ८.३० - सातवी 
सकाळी ८.३० ते ९.०० - DD चे अन्य कार्यक्रम
सकाळी ९.०० ते ९.३० -सहावी
सकाळी ९.३० ते १०.०० - पाचवी
सकाळी १०.०० ते १०.३० - चौथी
सकाळी १०.३० ते ११  - तिसरी
सकाळी ११.०० ते ११.३० - DD चे अन्य कार्यक्रम
सकाळी ११.३० ते दुपारी १२ - दुसरी
दुपारी १२ ते १२.३०  - पहिली
‘सह्याद्री’ दूरदर्शनवरील ही महामालिका टाटा स्काय वर १२९९, एअरटेल वर ५४८, डिश टीवी वर १२२९, व्हिडिओकॉन d2h वर ७६९, डीडी फ्रीडिश वर ५२५ आणि हाथवे वर ५१३ या क्रमांकांच्या चॅनल्सवर बघता येईल.
MKCL पुणे

No comments:

Post a Comment