Monday 19 December 2022

संत गाडगे महाराज

संत गाडगे महाराज

              संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगे महाराज यांचा जन्म  २३ फेब्रुवारी  १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव या गावी झाला , त्यांचे नाव डेबुजी होते ,  ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते.१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला.दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली.देव, देव करत लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत, कर्मकांड लोकांना अधोगतीकडे नेते हे जाणलेल्या गाडगेबाबांनी विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार करायला सुरुवात केली. समाजाची प्रगती ही स्वच्छतेतून होईल, शिक्षणातून होईल. हरी हरी करून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी लोकांना प्रयत्नवादी व्हावे लागेल, हे त्यांनी जाणले. ते फक्त विचार मांडणारे कीर्तनकार नव्हते तर प्रत्यक्ष विचार आचरणात आणून नंतरच त्यावर भाष्य करणारे होते. खेड्यापाड्यातील गल्लोगल्ली स्वत: खराटा फिरवणारे होते. स्वच्छतेच्या मोहिमेचा उपयोग जातीजातीतील भेदभाव नष्ट करण्यासाठीही त्यांनी केला. स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी विदर्भापासून खानदेशापर्यंत, पश्चिम महाराष्ट्रापासून मुंबई, कोकणापर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचवले. शिक्षण, सावकारी, देवस-नवस, पशुहत्या यांसारखे विषय घेऊन मायबोलीत कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन केले.अंधश्रद्धेवर, मूर्तिपूजेवर गाडगेबाबा बोच-या शब्दांत मार्मिकपणे हल्ला चढवायचे ‘अरे तुमी पंढरीले जाता, शेगावले जाता; पण त्यो तुमचा म्हणतात, ‘असा कसा तुमचा देव? कुत्रं निवद खाते तर त्याला हाडबी नाही मनत.’ हे ऐकून काही लोकांना हसू यायचे, तर देव मानणा-यांना राग यायचा. पण कीर्तनाला बाया, मुले, माणसे गर्दी करायचे.  मा. म. देशमुख गाडगेबाबांबद्दल लिहितात, ‘गाडगेबाबांनी भारतीय समाजाचे मन स्वच्छ केले.’
ज्या गावात संत गाडगेबाबांचे कीर्तन असायचे त्या गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना माहिती दिली जायची. त्या गावात जाऊन दिवसभर गल्ल्या स्वच्छ करून संध्याकाळी त्याच गावात कीर्तन करत असत. कीर्तनात टाळ, मृदंग, खंजिरी असायची. एक उदाहरण संपले की, ‘गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला..’या धृवपदाचा कीर्तनात गाभा असायचा. बाबा हे धृवपद हात उंच करून टाळ्या वाजवत तालात म्हणत, तसेच कीर्तन ऐकणा-यांना त्याच तालावर म्हणायला सांगायचे. मग दुसरा विषय घेऊन पुन्हा कीर्तनाला सुरुवात होई. ते ग्रामस्थांच्या, समाजातील अंधश्रद्धेवर टीका करून मवाळ भाषेत कथाकथन करून श्रोते आपलेसे करायचे. त्यांची भाषा गावाकडची. व-हाडी भाषा. त्यामुळे मले, तुले, बावा, लेकरू, पोरगं असे शब्द ते कीर्तनात वापरत असत. त्यातला मर्म समजला की, लोक पोट धरून धरून हसून दाद द्यायचे.  देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत.. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. असा हा स्वच्छतेचा पुजारी आधुनिक समाज सुधारक. आज इथे उद्या तिथे. अंगावर फाटक्या चिंध्यांचे कपडे व पाणी पिण्यासाठी गाडगे घेऊन, आज एका गावाला तर उद्या दुस-या गावाला, ना अन्नाची, ना जेवणाची, ना झोपण्याची फिकीर. जे मिळेल ते खायचे. जेथे जागा मिळाली तेथे झोपायचे. त्यांना फक्त एकच ध्यास होता तो कीर्तनातून लोकजागृती करायची. त्यापायी त्यांनी उभ्या संसाराकडे पाठ फिरवली. त्यांनी कीर्तनातून समाज प्रबोधनाचे महान कार्य केले. हे कार्य ते आजीवन करीत राहिले.संत गाडगेबाबा यांनी लोकशिक्षणाचे कार्य विदर्भातील ऋणमोचन या गावापासून सुरू केले. १९०८मध्ये पूर्णा नदीवरील घाट सर्वधर्मीयांसाठी, जातीसाठी खुला केला. १९२५ला मूर्तिजापूर येथे गोरक्षण धर्मशाळा व विद्यालय स्थापन केले. १९२७ला पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा सुरू केली.त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले म्हणून आठ फेब्रुवारी १९५२ रोजी श्रीगाडगेबाबा मिशन स्थापन केले. बाबांनी  डॉ. पंजाबराव देशमुख यांना शिक्षणसंस्थांद्वारे शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या कार्यात मदत केली. त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रभर शिक्षणसंस्था व अनाथ, अपंग यांच्या पुनर्वसनासाठी त्र्यंबकेश्वर, आळंदी, पंढरपूर इत्यादी ठिकाणी धर्मशाळा स्थापन केल्या.आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल एका ठिकाणी म्हणतात, ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात.’ १९३१ला वरवंडे येथे संत गाडगेबाबांच्या प्रबोधनाने पशुहत्या बंद झाली. १९५४ मध्ये जे. जे. रुग्णालय परिसरात त्यांनी धर्मशाळा बांधली. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांची संत गाडगेबाबांशी मुंबईला तसेच पंढरपूरला भेट झाली. पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा संत गाडगेबाबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली होती. या आधुनिक विज्ञानवादी संताचा डॉ. आंबेडकर आदर करीत. त्यांना ते गुरुसमान मानीत.. एकदा मुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचे भाषण सुरु होते ,अचानक गाडगे बाबांना पाहून बाबासाहेब देखील अचंबित झाले. वर केलेल्या दोन्ही हातात हार घेउन स्टेजसमोर उभ्या असलेल्या गाडगे महाराजांना बाबासाहेब म्हणाले." बाबा तुम्ही खाली का उभे..? वर या ना..". " नाही बाबासाहेब तुम्हीच खाली या आणि या अडाण्या चाहार घ्या.. वेळ होत होता म्हणून बाबासाहेब जरा रागातच म्हणाले.बाबा तुम्ही, स्टेजवर का येत नाही..?त्यावर ते संतशिरोमणी गाडगे महाराज शांतपणे स्नेहाद्र आवाजात बोलले..बाबासाहेब..तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात, त्या स्टेजला पाय लावायची माझी तरी लायकी नाही.गाडगेबाबांच्या तोंडून असे बोल बाहेर पडताक्षणीच बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. त्या महान संतांची पुष्पमाला स्वीकारली आणि दोघांनी एकमेकांना प्रेमाने कडकडून मिठी मारली. " आता तुमचे चालू द्या.असे बोलून क्षणांत गाडगे महाराज निघून गेले. त्या धर्माचा दहा कलमी कार्यक्रम समाजापुढे ठेवला. 
भुकेल्यांना अन्न, लहान लेकरांना अन्न, वस्ती नसणा-यांना वस्ती, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण, घर नसणा-यांना घराचा निवारा, आसरा, काम नसणा-यांना कामधंदा, रोजगार, अंध, अपंग, रुग्णांना औषधे, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न जमवून देणे, दु:खी, निराश असणा-यांना हिंमत देऊन जगण्याचे बळ देणे इत्यादी त्यांचे विचार आजही सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. त्यांनी रोकडा धर्म सांगितला. त्यांनी कीर्तनातून विज्ञानवादी लोकजागृती, लोकप्रबोधनाचे कार्य अखेरच्या श्वासापर्यंत केले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देवून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment